AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई! १८६ लिटर दूध नष्ट, ११२ किलो मसाला जप्त

सलग दुसऱ्या दिवशी तपासणी मोहीम सुरू; अमरावतीतील ७ दूध आस्थापनांची तपासणी, ७ नमुने प्रयोगशाळेत

अमरावती | सिटी न्यूज

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अमरावती शहरात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि मसाल्यांच्या तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेत १८६ लिटर दूध नष्ट करण्यात आले, तर मिरची आणि हळद पावडर मिळून ११२ किलो मसाला जप्त करण्यात आला आहे. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून तपासणी सुरू असून, प्रयोगशाळेतील अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

शीतगृहाची व्यवस्था नसल्याने १८६ लिटर दूध नष्ट

या मोहिमेदरम्यान अमरावती शहरातील आतापर्यंत सात दूध विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये राजहंस एजन्सी येथे दूध साठवण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था नसल्याचे आढळून आल्याने तेथील १८६ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

मसाला कारखान्यातून ११२ किलो पावडर जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील शिवा येथील हिंगणे मसाला कारखान्याचीही तपासणी केली. या कारवाईत ६१ किलो मिरची पावडर आणि ५१ किलो हळद पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे मसाला उत्पादन आणि साठवणुकीच्या प्रक्रियेवरही प्रशासनाचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सात नमुने प्रयोगशाळेत; अहवालाकडे लक्ष

तपासणी मोहिमेदरम्यान एकूण सात नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्कर्ष स्पष्ट होतील. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

बाईट : गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी

बाईट : आदिती देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी

कोजागिरी पौर्णिमेच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे. नागरिकांनीही दूध, मिठाई आणि मसाल्यांची खरेदी करताना स्वच्छता, साठवणूक आणि उत्पादनावरील माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button