कोणार्क कंपनीची 2.75 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; ठेकेदारासह तिघांवर गुन्हा

76 वाहनांचा व्यवहार; कंपनीच्या ताब्यातील वाहने परस्पर घेऊन गेल्याची तक्रार
अमरावती : अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कंत्राटदार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची तब्बल 2 कोटी 75 लाख 80 हजार 300 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणार्क कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक आदित्य सुरवाडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी कर्नलसिंग राहल, राजेश गुप्ता आणि मनोज साबू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक वाहने खरेदी करण्याच्या व्यवहारात कर्नलसिंग राहल यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर कोणार्क कंपनीने श्री नागरिक सेवा सहकारी संस्था आणि तुळजाई ट्रान्सपोर्ट यांच्याशी बोलणी करून एकूण 76 वाहनांच्या विक्रीचा तोंडी करार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या व्यवहारापोटी कोणार्क कंपनीने तुळजाई ट्रान्सपोर्टला 16 वाहनांसाठी 53 लाख 80 हजार 300 रुपये, तर श्री नागरिक सेवा सहकारी संस्थेला 60 वाहनांसाठी 2 कोटी 22 लाख रुपये टप्प्याटप्प्याने ऑनलाइन आणि चेकद्वारे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच 60 वाहनांपैकी 47 वाहनांचे टॅक्स इन्व्हॉइसही कंपनीने घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
19 सप्टेंबरला 76 वाहने ताब्यात घेतल्याचा आरोप
तक्रारीनुसार, 19 सप्टेंबर रोजी व्यवहारावरून वाद झाल्यानंतर कर्नलसिंग राहल, राजेश गुप्ता आणि मनोज साबू यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कोणार्क कंपनीच्या ताब्यात असलेली 76 वाहने परस्पर घेऊन गेल्याचा आरोप आहे.
यानंतर कंपनीच्या वतीने करारनामा आणि वाहनांबाबत तिघांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी समाधानकारक माहिती न देता टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोणार्क कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापक आदित्य सुरवाडे यांनी सिटी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सिटी कोतवाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षानंतर स्पष्ट होणार असून, पोलिस तपासात व्यवहारातील करार, आर्थिक व्यवहार आणि 76 वाहनांच्या ताब्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



