Accident NewscitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; २३ मजूर जखमी

चैनल क्रमांक १२८ जवळ पहाटे ५ वाजता बुलेरोचा अपघात; १६ जखमींना अमरावतीला रेफर, ७ जणांवर धामणगावात उपचार

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी : संतोष वाघमारे

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास चैनल क्रमांक १२८ जवळ बुलेरो पिकअप वाहनाचा अपघात झाला. या दुर्घटनेत सोयाबीन काढणीच्या कामासाठी जाणारे तब्बल २३ स्त्री-पुरुष मजूर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलेरो पिकअप वाहनातून हे मजूर सोयाबीन काढणीच्या कामासाठी जात होते. प्रवासादरम्यान वाहनाची चेन तुटल्याने बुलेरो काही अंतर फरफटत गेली आणि त्यानंतर अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने या दुर्घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

२३ जखमींवर उपचार

अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी मजुरांना तातडीने धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर १६ जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. तर उर्वरित ७ जखमींवर धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातातील जखमींची प्रकृती आणि घटनेबाबतची अधिक माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.

दुर्गादेवीच्या अपघातानंतर पुन्हा दुर्घटना

विशेष म्हणजे, कालच वर्धा परिसरात दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. बुलेरो पिकअप वाहनाची चेन तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थितीबाबत पोलीस तपास करीत आहेत.

समृद्धी महामार्गावर सलग घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button