धारणीतील एकमेव क्रीडा संकुलाची दुरवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खेळाडूंसह नागरिक त्रस्त

मैदानाची अवस्था खराब, परिसराच्या देखभालीकडेही दुर्लक्ष; जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
धारणी | प्रतिनिधी : संदीप राऊत
धारणी शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले एकमेव क्रीडा संकुल सध्या दुरवस्थेच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा, व्यायाम आणि आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या या क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धारणी शहरात हे एकमेव क्रीडा संकुल असून, दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. लहान मुलांपासून तरुण, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण या ठिकाणी चालणे, व्यायाम आणि जिमसाठी येत असतात. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी हे क्रीडा संकुल केवळ खेळाचे मैदान नसून आरोग्य आणि व्यायामाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
मात्र, सध्या या क्रीडा संकुलातील ग्राउंडची अवस्था अत्यंत खराब झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मैदानाची योग्य देखभाल होत नसल्याने खेळाडू तसेच व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैदानाची दुरुस्ती आणि परिसराची नियमित देखभाल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, क्रीडा संकुल परिसरात विद्युत व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी काही धारणीकरांनी मोठ्या प्रयत्नातून विद्युत लाईन उपलब्ध करून घेतली, अशी माहिती नागरिकांनी दिली. तसेच संकुलाचा परिसर हिरवाईने नटावा यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत विविध झाडांची लागवडही केली आहे.
नागरिकांच्या प्रयत्नातून उभारलेल्या या सुविधांकडे मात्र संबंधित क्रीडा संकुल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
क्रीडा संकुलाच्या कायापालटाची अपेक्षा
धारणीसारख्या आदिवासीबहुल भागात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी चांगल्या क्रीडा सुविधांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील एकमेव क्रीडा संकुलाची अवस्था सुधारणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी या क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून मैदानाची दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, झाडांची देखभाल तसेच संपूर्ण परिसराच्या देखभालीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास धारणीतील या क्रीडा संकुलाचा निश्चितच कायापालट होऊ शकतो आणि त्याचा फायदा शहरातील खेळाडू, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
सिटी न्यूज | संदीप राऊत | धारणी



