पावसाळी विश्रांतीनंतर चोरबाहुली गेटची जंगल सफारी सुरू; पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून सफारीचा शुभारंभ; चितळ, सांबर, नीलगाय, हत्तींसह वाघांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक उत्सुक
रामटेक | प्रतिनिधी : अजय मेहरकुळे
पावसाळी विश्रांतीनंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली गेटची जंगल सफारी आजपासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून चोरबाहुली गेटचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. सफारीच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत पेंचच्या निसर्गरम्य जंगलाचा आनंद घेतला.
पावसाळ्यात वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने जंगल सफारीला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता पावसाळी विश्रांती संपल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी जंगलाची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पूजा-अर्चेनंतर सफारीला सुरुवात
चोरबाहुली गेटवर सफारीसाठी प्रथम प्रवेश करणाऱ्या पर्यटकांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. त्यानंतर एका चिमुकलीच्या हस्ते रिबीन कापून सफारी गेटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, निसर्ग मार्गदर्शक, जीप्सी चालक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सफारी सुरू झाल्याची माहिती मिळताच पहिल्याच दिवशी पर्यटकांनी चोरबाहुली गेटकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. त्यामुळे गेट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक पर्यटकांनी कुटुंबीयांसह जंगल सफारीचा अनुभव घेतला.

वन्यजीवांचे दर्शन ठरणार आकर्षण
चोरबाहुली जंगल परिसरात वन्यजीवांची समृद्ध विविधता पाहायला मिळते. चितळ, सांबर, नीलगाय, हत्ती यांसह विविध वन्यजीवांचे दर्शन या परिसरात पर्यटकांना घडते. विशेष म्हणजे या भागात वाघांचेही वास्तव्य असल्याने चोरबाहुली गेटला वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे सांगण्यात येते.
पावसाळ्यानंतर जंगलाचा परिसर अधिक हिरवागार आणि निसर्गरम्य झाला असून, त्यामुळे यंदाच्या सफारी हंगामात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि निसर्ग मार्गदर्शक उपस्थित
चोरबाहुली गेटच्या सफारी शुभारंभ कार्यक्रमाला वनपरीक्षेत्र अधिकारी जयेश तायडे, वनपरीक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, क्षेत्रसहाय्यक गणेश खंडाईत, दुर्गाप्रसाद खंडाते, वनरक्षक, निसर्ग मार्गदर्शक, जीप्सी चालक तसेच मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते.
पावसाळी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पेंचच्या जंगलात सफारीचा थरार अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, हिरवाईने नटलेले जंगल आणि वन्यजीवांचे दर्शन यामुळे आगामी काळात चोरबाहुली गेटवर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक.



