राम मेघे महाविद्यालयात १९ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला; संशयित ताब्यात

प्रॅक्टिकल परीक्षा देऊन लॉबीमधून जात असताना पाठीमागून हल्ला; सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांनी संशयिताला पकडले
अमरावती : अमरावतीच्या बडनेरा शहरातील राम मेघे फार्मासिस्ट महाविद्यालयात १९ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा देऊन लॉबीमधून जात असताना तरुणीवर पाठीमागून अचानक चाकूने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही घटना दुपारी साधारण दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी प्रॅक्टिकल परीक्षा देऊन महाविद्यालयाच्या लॉबीमधून पायऱ्यांच्या दिशेने जात होती.
याचवेळी नवीन मद्राज वनवानी, वय १९, रा. सिंधी कॅम्प, नवी वस्ती, बडनेरा याने पाठीमागून येत तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयातील सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
यानंतर घटनास्थळी काही विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी झाली. संशयिताला मारहाण झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत संशयिताला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांचे पथक तातडीने महाविद्यालयात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली.
या घटनेनंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त शाम घुगे, यशवंत सोळंके, प्रांजली सोनवणे आणि एसीपी ब्राह्मणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या चाकू हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे, हल्ल्यामागे संशयिताचा उद्देश काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बडनेरा पोलीस करीत आहेत.
महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कितपत प्रभावी आहेत, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत ऊर्लागोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राम मेघे महाविद्यालयातील या चाकू हल्ल्याचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



