तुली इंटरनॅशनल हॉटेलमधील विना परवाना पार्टीवर पोलिसांची कारवाई

गुलाबी पार्टीवर सदर पोलिसांचा छापा; हुक्का पार्टीचे साहित्य जप्त, आयोजकांसह हॉटेल मॅनेजर आणि मालकाविरोधात गुन्हा
नागपूर : नागपूरच्या तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये विना परवाना आयोजित करण्यात आलेल्या गुलाबी पार्टीवर सदर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकत हुक्का पार्टीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पार्टीच्या आयोजकांसह हॉटेलचा मॅनेजर आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये शहर गुलाबी या नावाने कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, या पार्टीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याची गोपनीय माहिती सदर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पार्टीदरम्यान हुक्का पार्टीसाठी स्वतंत्र रूम उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणाहून दोन मोठे हुक्का पॉट, प्रतिबंधित फ्लेवर, इलेक्ट्रिक हीटर आणि इतर साहित्य असा सुमारे ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आयोजक आबीद शफिक काजी आणि आलिशा मॅन्युअल चौरी, तसेच हॉटेलचा मॅनेजर फिरोज आणि हॉटेल मालकाविरोधात विविध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पार्टीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींसह एकूण ३० जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पार्टीचे आयोजन, परवानगी तसेच हुक्का पार्टीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बाबींची चौकशी केली जात आहे.
तुली इंटरनॅशनल हॉटेलमधील या कारवाईनंतर विना परवाना पार्टी आणि हुक्का पार्टीच्या आयोजनावर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता पुढील तपासात या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी पाहत राहा… सिटी न्यूज!



