citynewsWashim

वाशिममध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

देव तलावात पहाटे तीन वाजेपर्यंत विसर्जन; यंदा सर्व सार्वजनिक गणेशमूर्तींचे एकाच ठिकाणी विसर्जन

वाशिम : वाशिम शहरात लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष विसर्जनाला सुरुवात झाली. पहाटे तब्बल तीन वाजेपर्यंत देव तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.

ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे देव तलाव परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षी पाच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन देव तलावात, तर त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन पैनगंगा नदीपात्रात केले जाते.

मात्र यंदा वाशिम जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून पैनगंगा नदीपात्रात पाण्याची कमतरता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नगर परिषदेने पाच फुटांपेक्षा मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जनही देव तलावात करण्यास परवानगी दिली. त्यामुळे यंदा शहरातील सर्व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन देव तलावातच करण्यात आले.

गणेश विसर्जनासाठी देव तलाव परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण असतानाही विसर्जन मिरवणूक तसेच संपूर्ण विसर्जन प्रक्रिया शांततेत पार पडली.

भक्तिभावाने आणि उत्साहात गणरायाला निरोप देत वाशिम शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button