यवतमाळमध्ये दुष्काळाच्या मदतीसोबत कमी पावसातील बियाण्यांवर संशोधनाची मागणी

खरीप हंगामाला पावसाचा फटका; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसोबत दीर्घकालीन उपाययोजनांची अपेक्षा
यवतमाळ : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता असतानाही चांगले उत्पादन देणाऱ्या बियाण्यांवर संशोधन करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यंदा यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मोठी पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सुमारे १२०० मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र यंदा ६०० मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
प्रत्यक्षात झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने कोणत्याही अटी-शर्ती न लावता शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर कमी पाण्यात आणि कमी पावसातही चांगले उत्पादन देणाऱ्या बियाण्यांवर कृषी क्षेत्रातील संशोधनाला गती देण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत.
खरीप हंगामातील नुकसानाचा थेट परिणाम पुढील रब्बी हंगामावरही होतो. खरीप पिकातून मिळणारे उत्पन्न घटल्याने रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांचा खर्च करणे शेतकऱ्यांसाठी कठीण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक मदतीवर अवलंबून ठेवण्याऐवजी बदलत्या हवामान परिस्थितीतही शेती टिकवून ठेवण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्याची गरज शेतकरी विजय निवल यांनी व्यक्त केली.

दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीची आर्थिक मदत आणि दीर्घकालीन शेतीविषयक उपाययोजना या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कमी पावसातही उत्पादन देणाऱ्या बियाण्यांवरील संशोधनाला शासनाकडून कितपत गती मिळते, याकडे आता यवतमाळमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



