citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNagpurNagpurPolicepolitics

खरगे यांच्या सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणावरून नितीन राऊत आक्रमक

पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार; SC-ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी

नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या आरोपावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. या कथित प्रकारावर काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत FIR दाखल करावी, अशी मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, मल्लिकार्जुन खरगे हे अनुसूचित जाती समाजातून येणारे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे शुद्धीकरण करण्यात आल्याचा प्रकार खरा असल्यास, एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने किंवा उपस्थितीने सार्वजनिक ठिकाण अशुद्ध होते, असा जातीय मानसिकतेतून घातक संदेश जाण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला.

या कथित प्रकारामागे जातीय हेतू होता का, संबंधित व्यक्ती कोण होत्या आणि त्यांची नेमकी भूमिका काय होती, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे.

तसेच या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर उपलब्ध पुरावे तातडीने संकलित करून निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

घटना सत्य असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणाच्या आरोपामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे. राऊत यांच्या तक्रारीवर पोलीस काय भूमिका घेतात, FIR दाखल होते का आणि तपासातून या कथित प्रकारामागील नेमके सत्य काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button