citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर मनपाची धडक कारवाई

257 प्रकरणांत 1 लाख 75 हजार 900 रुपयांचा दंड वसूल; प्लास्टिक, कचरा आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांवर कडक कारवाई

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिक, व्यावसायिक आणि आस्थापनांविरोधात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत पथकाने विविध प्रकारच्या 257 प्रकरणांची नोंद करून तब्बल 1 लाख 75 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे, रस्त्यावर अथवा फुटपाथवर कचरा टाकणे, हातगाडी व स्टॉल परिसरात अस्वच्छता निर्माण करणे, जनावरे बांधणे, बांधकामाचा मलबा टाकणे, हॉटेलमधून घाण रस्त्यावर सोडणे अशा विविध प्रकारच्या उपद्रवांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

हातगाडी, स्टॉल आणि पानठेल्यांवर मोठी कारवाई

हातगाडी, स्टॉल, पानठेले, फेरीवाले तसेच छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी 133 प्रकरणांची नोंद करण्यात आली. या कारवाईत 53 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी 11 प्रकरणांत 1 हजार 100 रुपये, तर दुकानदारांकडून रस्ता, फुटपाथ आणि मोकळ्या जागेत कचरा टाकल्याबद्दल 28 प्रकरणांत 11 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग-बोर्डिंग, सिनेमागृह, मंगल कार्यालये आणि कॅटरर्सकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी 10 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हॉटेलमधून रस्त्यावर घाण पसरविणाऱ्यांवर कारवाई

हॉटेलमधील डिसेल्टिंग चेंबर चोक झाल्यानंतर रस्त्यावर घाण पसरवणे तसेच कचरा शुल्क न भरण्याच्या प्रकरणांतही मनपाने कठोर कारवाई केली. या प्रकारात 13 प्रकरणांची नोंद करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

चिकन सेंटर आणि मटन विक्रेत्यांकडून रस्त्यावर, फुटपाथवर अथवा मोकळ्या जागेत कचरा टाकल्याप्रकरणी 2 प्रकरणांत 2 हजार रुपये, तर वर्कशॉप आणि गॅरेजकडून कचरा टाकल्याप्रकरणी 3 प्रकरणांत 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचा मलबा किंवा टाकाऊ कचरा टाकल्याप्रकरणी 1 प्रकरणात 2 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

उघड्यावर मलमूत्र विसर्जन आणि जनावरे बांधण्यावरही कारवाई

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ आणि मोकळ्या जागेत उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्याप्रकरणी 6 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधल्याप्रकरणी 3 प्रकरणांत 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याच्या एका प्रकरणात 200 रुपयांचा दंड करण्यात आला.

याशिवाय विविध प्रकारच्या इतर उपद्रवांबाबत 46 प्रकरणांची नोंद करून 9 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पिशव्यांविरोधातही कारवाई

मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातही कारवाई केली. 9 प्रकरणांत 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याप्रकरणी 1 प्रकरणात 5 हजार रुपये, रस्त्यालगत बांधकाम साहित्य साठवल्याबद्दल 5 प्रकरणांत 50 हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी 1 प्रकरणात 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी उरलेले अन्न टाकल्याप्रकरणी एका प्रकरणात 10 हजार रुपये, तर शासकीय भूमिगत नालीवरील चेंबरमध्ये कचरा अथवा साहित्य टाकून अडथळा निर्माण करणे आणि बांधकामादरम्यान चेंबरचे नुकसान केल्याप्रकरणी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या विशेष कारवाईत उपद्रव शोध पथकाने 37 प्रकरणांची नोंद करून 2 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

अस्वच्छता करणाऱ्यांना मनपाचा इशारा

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नागरिक आणि व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अस्वच्छता निर्माण करू नये तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छता आणि शहरातील शिस्त कायम ठेवण्यासाठी अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button