citynewsLatest News

मालेगावात चोरीच्या तपासातून मोठं नेटवर्क उघड; दोन सराईत चोरटे अटकेत

इनोव्हा कारसह 28 गॅस सिलेंडर, शेती साहित्य, किराणा माल आणि चोरीसाठी वापरलेलं साहित्य जप्त

वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये अवघ्या 35 हजार 800 रुपयांच्या चोरीच्या तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांच्या हाती लागला चोरीच्या मोठ्या नेटवर्कचा धक्कादायक माग! मालेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून इनोव्हा कार, तब्बल 28 गॅस सिलेंडर, शेतीचे साहित्य, किराणा माल आणि अगदी टूथब्रशपर्यंत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

मालेगाव पोलिसांकडे 35 हजार 800 रुपयांच्या चोरीची तक्रार दाखल झाली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गाव गाठण्यात आलं.

यावेळी पोलिसांनी रामनारायण चव्हाण आणि अमीज खां पठाण या दोघांना ताब्यात घेत अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून एक इनोव्हा कार आणि तब्बल 28 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.

मात्र, तपास इथेच थांबला नाही. आरोपींकडून शेती आणि कृषी कामासाठी वापरलं जाणारं साहित्य, किराणा दुकानातील मोठ्या प्रमाणातील माल, विविध वस्तू आणि टूथब्रशसारख्या वस्तूही पोलिसांच्या हाती लागल्या.

विशेष म्हणजे, आरोपींकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिझेल चोरी करण्यासाठी वापरली जाणारी मशीनदेखील आढळून आली आहे.

किराणा दुकानातून चोरी केलेला लाखो रुपयांचा मालही पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे या दोघांनी केवळ मालेगावमध्येच नव्हे, तर परिसरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना केल्या असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या मालेगाव पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून, जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूचा संबंध कोणत्या चोरीच्या घटनेशी आहे, याचा तपास सुरू आहे.

मालेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या अनेक घटनांचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात आणि या चोरीच्या मालामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button