मुंबईतील 5 नामांकित आस्थापनांवर FDAची धडक कारवाई; परवाने निलंबित

बनावट चीज, मुदतबाह्य खाद्यरंग, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता आढळली; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन
मुंबई: अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील पाच आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान बनावट चीज, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, अयोग्य साठवणूक तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर या पाचही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDAच्या कारवाईत खालील आस्थापनांचा समावेश आहे:
1. M/s Otters Club – वांद्रे
तपासणीदरम्यान ‘Regular Cheese’च्या नावाखाली प्रतिबंधित ‘Analogue Cheese’ वापरला जात असल्याचे आढळले. याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचे FDAच्या निदर्शनास आले.
2. Daily Fresh Bakers and Cakes – दहिसर
या बेकरीमध्ये मुदतबाह्य खाद्यरंगाचा वापर, तसेच झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव आढळला. याशिवाय केक तयार करण्याचे काम थेट जमिनीवर केले जात असल्याचेही तपासणीत समोर आले.
3. Prince of Wales Restaurant – खार
या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांच्या तापमान नियंत्रणात त्रुटी, अस्वच्छ परिसर आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे FDAने नमूद केले.
4. M/s Raj Oil Trading – विलेपार्ले
या आस्थापनात तेलाच्या पाकिटांवर उंदरांनी कुरतडल्याच्या खुणा आढळल्या. तसेच दुर्गंधी आणि खाद्यतेलाच्या अयोग्य साठवणुकीसारख्या त्रुटीही समोर आल्या.
5. M/s Cafe Sifaarish – अंधेरी
कॅफेमध्ये अपुरे स्वच्छता मानदंड, खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळून आले.
FDAची कारवाई सुरूच
मुंबईतील खाद्य व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी FDAकडून विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर परवाना निलंबनासह कठोर कारवाई केली जात आहे.
ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी स्वच्छता, योग्य साठवणूक, तापमान नियंत्रण आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. FDAच्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे.



