AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ‘शेवंती लागवड व संवर्धन’ कार्यशाळा उत्साहात

आधुनिक तंत्रज्ञान, कलम निर्मिती, खत-पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन; विद्यार्थी, बागकामप्रेमी व उत्पादकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती | प्रतिनिधी

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात ‘शेवंती लागवड व संवर्धन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. डीबीटी स्टार योजनेअंतर्गत अमरावती गार्डन क्लब आणि अमरावती हौशी बाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक, बागकामप्रेमी आणि शेवंती उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी भारताचे माजी कृषिमंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संगीता इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गजेंद्र पचलोरे, श्री संजय कांदळकर, कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री संजय काळे व श्री अविनाश भोजापूरे आणि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिनेश खेडकर उपस्थित होते. डॉ. व्ही. आर. देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे आवाहन

प्रास्ताविकात डॉ. दिनेश खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न राहता कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

प्रा. गजेंद्र पचलोरे यांनी शेवंती लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. श्री संजय कांदळकर यांनी अमरावती हौशी बागेच्या कार्याची माहिती देत शेवंती लागवडीतील आपले अनुभव उपस्थितांशी शेअर केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. संगीता इंगोले यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, उद्योजकता आणि पर्यावरणपूरक बागकामाची आवड निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

शेवंती लागवडीच्या आधुनिक तंत्रांचे मार्गदर्शन

कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात डॉ. रेखा मॅगीरवार यांनी शेवंतीच्या विविध जाती, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, संवर्धन आणि प्रदर्शनासाठी आवश्यक तंत्र याबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर श्री संजय काळे आणि श्री अविनाश भोजापूरे यांनी प्रात्यक्षिक सत्रातून शेवंतीच्या विविध जाती, कलमे तयार करण्याची पद्धत, कुंडीतील लागवड, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण आणि प्रदर्शनासाठी रोपांची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

उपस्थितांना शेवंती लागवड, कलम निर्मिती, कुंडी व्यवस्थापन आणि रोपांची निगा यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

विविध जातींच्या रोपांचे प्रदर्शन

कार्यशाळेच्या परिसरात शेवंतीच्या विविध आकर्षक जाती, रोपे, कटिंग्ज तसेच एडेनियम आणि बागकाम साहित्याचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. उपस्थितांनी या प्रदर्शनाला मोठ्या उत्साहाने भेट देत विविध जातींची माहिती घेतली. अनेकांनी रोपे आणि बागकाम साहित्याची खरेदीही केली.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तांत्रिक सत्र, प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचा उत्साहाने लाभ घेतला.

आयोजनासाठी विभागाचे विशेष प्रयत्न

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. गणेश हेडावू, डॉ. अंकित काळे, विभागातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती पुंडकर यांनी केले, तर प्रा. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले. त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.

या कार्यशाळेमुळे शेवंती लागवडीचे आधुनिक तंत्र, बागकामातील कौशल्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उद्योजकीय संधींबाबत विद्यार्थी तसेच बागकामप्रेमींना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button