चेंबूरमध्ये Zeptoवर FDAची मोठी कारवाई; खाद्य परवाना निलंबित

तापमान नियंत्रणात गंभीर त्रुटी, झुरळांसाठी पोषक वातावरण आणि अस्वच्छता आढळली; अनुपालन अहवाल न दिल्याने परवाना निलंबित
मुंबई: अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चेंबूरमधील Zeptoच्या एका युनिटचा खाद्य व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळल्यानंतर FDAने संबंधित आस्थापनाला सुधारणा करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, निर्धारित मुदतीत अनुपालन अहवाल साद न केल्याने परवाना निलंबित करण्यात आला.
FDAच्या तपासणीदरम्यान चिल्ड नॉन-व्हेज खाद्यपदार्थांचे तापमान 9 अंश सेल्सिअस आढळले. नियमानुसार हे तापमान 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर फ्रोझन खाद्यपदार्थांचे तापमान उणे 11 अंश सेल्सिअस आढळले, जे नियमानुसार उणे 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
तपासणीदरम्यान परिसरात झुरळे आणि इतर कीटकांची वाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय खराब झालेल्या भिंती आणि छत, तेलगळती, तापमान नोंदींमध्ये त्रुटी आणि योग्य कीटक नियंत्रण कार्यक्रमाचा अभाव आढळून आला.
तसेच पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक असलेला चाचणी अहवाल उपलब्ध नसल्याचेही तपासणीत समोर आले. या सर्व त्रुटींमुळे संबंधित युनिटच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोन महिन्यांत Zeptoच्या अनेक युनिटवर कारवाई
गेल्या दोन महिन्यांत FDAने मुंबई आणि पुण्यातील Zeptoच्या अनेक युनिट्सवर कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत Zeptoच्या पाच युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आले होते.
यामध्ये मुलुंड येथील युनिटमध्ये अपुरी कचरा व्यवस्थापन व्यवस्था आणि तापमान नियंत्रणातील त्रुटी, तर गोरेगावमधील युनिटमध्ये तापमान, प्रकाश व्यवस्था आणि खाद्यपदार्थांच्या साठवणुकीशी संबंधित त्रुटी आढळल्या.
अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील युनिटमध्ये खाद्यपदार्थांच्या जवळ धोकादायक रसायने ठेवण्यात आल्याचे आणि आवश्यक अँटी-रूमची कमतरता आढळली. तर पुण्यातील लोहेगाव युनिटमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ, FIFO/FEFO पद्धतीचे पालन न होणे, अस्वच्छता आणि अपुरी कीटक नियंत्रण व्यवस्था आढळून आली.
अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन
क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची साठवणूक आणि वितरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने योग्य तापमान, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि अन्नसुरक्षा नोंदींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, चेंबूरमधील Zepto युनिटचा परवाना निलंबित करण्याच्या कारवाईमुळे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्विक-कॉमर्स आस्थापनांवर FDAची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



