एनईपी-२०२० अंतर्गत शैक्षणिक कार्यभार नियोजनावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजन; विद्यापीठाच्या विनियमांमुळे कार्यभार निश्चितीची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक होणार
अमरावती | दि. ११ ऑगस्ट २०२६
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने महाविद्यालयांतील शैक्षणिक कार्यभार नियोजनाची प्रक्रिया अधिक सुस्पष्ट, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील विविध संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक, एनईपी सेल समन्वयक, कार्यभार नियमन समन्वयक आणि ज्येष्ठ प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे होते, तर प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या विनियमांची माहिती
यावेळी डॉ. दीपक धोटे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या पार्श्वभूमीवर बदललेल्या शैक्षणिक संरचनेनुसार कार्यभार निश्चितीची आवश्यकता आणि त्यामागील शैक्षणिक भूमिका स्पष्ट केली. शैक्षणिक कार्यभार तसेच आवश्यक पदसंख्येच्या निर्धारणाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विनियम क्र. ११ व १२/२०२६ निर्गमित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यापीठाची भूमिका ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे स्पष्ट करताना त्यांनी ही प्रक्रिया महाविद्यालयांसाठी उपयुक्त आणि व्यवहार्य असल्याचे सांगितले.
एक्सेल प्रोग्रामद्वारे प्रात्यक्षिक
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या प्रारूपांच्या आधारे शैक्षणिक कार्यभार कसा निश्चित करता येतो, याचे प्रात्यक्षिक दिले.
विशेष विकसित केलेल्या संगणकीय एक्सेल प्रोग्रामच्या माध्यमातून प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या नोंदवल्यानंतर विविध विषयांचा कार्यभार कशा पद्धतीने निश्चित करता येतो, हे प्रत्यक्ष दाखविण्यात आले. त्यामुळे कार्यभार निश्चितीची प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यासाठी दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी कार्यभार निश्चितीच्या समस्येवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने व्यवहार्य मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले.
विद्यापीठाने विकसित केलेले विनियम आणि कार्यभार गणनेची प्रारूपे संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरावीत, तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये कार्यभार निश्चितीची एकसमान, पारदर्शक आणि शास्त्रशुद्ध पद्धत अस्तित्वात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यशाळेला विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अरुण हरणे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, विद्या विभागाचे उपकुलसचिव डॉ. ऋतुराज देशमुख आणि महाविद्यालयीन विभागाच्या सहायक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी या उपक्रमासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला विनियमांच्या जनजागृतीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी विद्यापीठाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी केले, तर विद्यापीठ आयक्यूएसीचे संचालक डॉ. संदीप व्ही. वाघुळे यांनी आभार मानले.
या कार्यशाळेमुळे एनईपी-२०२०च्या अनुषंगाने महाविद्यालयांतील शैक्षणिक कार्यभार निश्चितीबाबत अधिक स्पष्टता, सुसूत्रता आणि व्यावहारिक दिशा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.



