सीसीएमपी नोंदणी प्रस्तावाला अमरावती आयएमएचा तीव्र विरोध; २४ तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलन

बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात निवेदन; रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि विविध वैद्यकीय संघटनांनी सीसीएमपी अर्हताधारक बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखा, मार्ड (MARD), एएसएमआय (ASMI) तसेच विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी या प्रस्तावाविरोधात एकत्रित भूमिका घेतली आहे. या प्रस्तावामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके धोक्यात येतील, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा आयएमएने केला आहे.
या संदर्भात शासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे भूमिका मांडूनही योग्य दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात आले. संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यास हे आंदोलन बेमुदत करण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.
आयएमएने स्पष्ट केले की, हा निषेध रुग्णांविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी तसेच आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील वैज्ञानिक आणि नैतिक मानदंड जपण्यासाठी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रस्तावाबाबत शासनाची भूमिका आणि पुढील निर्णयाकडे राज्यातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



