अमरावती मनपा आयुक्तांच्या नावाने व्हॉट्सअॅप फसवणूक; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नावाचा गैरवापर करून पैशांची मागणी; संशयास्पद संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्सअॅपद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्ती आयुक्तांच्या नावाने नागरिकांकडे पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती एका व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर करून आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नावाने नागरिकांशी संपर्क साधत आर्थिक मदतीची अथवा पैशांची मागणी करत आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आयुक्तांच्या नावाने कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअॅप, फोन किंवा इतर माध्यमातून आर्थिक मदतीची अथवा पैशांची मागणी केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे संदेश किंवा कॉल प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, आयुक्तांच्या नावाने संशयास्पद संदेश किंवा कॉल प्राप्त झाल्यास त्याची तात्काळ सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खातरजमा करावी आणि अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या संदेशांकडे विशेष सावधगिरीने पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनीही नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहावे, संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये आणि अशा प्रकारांची त्वरित सायबर गुन्हे शाखेला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.



