citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPolice

नागपूर ग्रामीण पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कन्हानमधील ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या आरोपींसह तिघांना अटक; पाच गुन्ह्यांची उकल, चोरीचा मुद्देमाल जप्त

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. कन्हान येथील ज्वेलर्स दुकान फोडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गोंडेगाव येथे असलेल्या किशोर ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव उर्फ तेलानी राजू राठोड आणि त्याच्या एका विधीसंघर्षग्रस्त साथीदाराचा शोध घेतला. आरोपी रेल्वेमार्गे पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कामठी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

पुढील चौकशीत या प्रकरणातील आणखी एक आरोपी साहिल किशोर लांजेवार यालाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी कन्हान आणि कोराडी परिसरातील घरफोडी व जबरी चोरीच्या एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपींकडून चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्येही या आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, आरोपींच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button