अरोली पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकमधून ३५ गोवंश जनावरांची सुटका

अवैध वाहतुकीवर धडक; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यात गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात अरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ३५ गोवंश जनावरांची सुटका केली. कोढामेंळी शिवारात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अरोली पोलिसांना गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कोढामेंळी शिवार परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयास्पदरीत्या जाणारा आयशर कंपनीचा ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ३५ गोवंश जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून नेली जात असल्याचे आढळून आले. जनावरांच्या शिंगांना आणि पायांना दोऱ्यांनी बांधण्यात आले होते. तसेच त्यांच्यासाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत कमी जागेत त्यांची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईदरम्यान ट्रक चालक सय्यद फिरोज सय्यद अमीर (वय ४७, रा. नागपूर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सुमारे ७ लाख रुपयांचा ट्रक आणि ३ लाख ५० हजार रुपयांची गोवंश जनावरे असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अरोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
अरोली पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरात स्वागत होत असून, गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.



