citynewsLatest NewsMaharashtraPune

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारूमुळे 15 जणांचा मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर

महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारूचे सेवन केल्यानंतर तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक तपासात योगेश वानखेडे नावाच्या आरोपीने ही विषारी दारू तयार करून विविध भागात विक्री केल्याचे समोर आले आहे. आरोपी अवैध दारू व्यवसायात सक्रिय असल्याची माहितीही पोलिस तपासात उघड झाली आहे.

पोलिसांनी आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

तपासात असेही निष्पन्न झाले की, स्पिरिट मिसळून तयार करण्यात आलेली ही विषारी दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात विकली जात होती. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील नागरिकांनी या दारूचे सेवन केले होते.

दारू सेवन केल्यानंतर काही वेळातच संबंधितांची प्रकृती खालावू लागली. काही जणांच्या तोंडातून फेस येऊ लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये राहुल शरद क्षीरसागर (45), विजय भुकुरलाल शर्मा (45), अरुण दादर, अशोक रमेश चव्हाण आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर पिंपरी-चिंचवडमधील मृतांमध्ये पांडुरंग सदाशिव फुगे (57), विजय प्रकाश राठोड (31), राजेंद्र प्रकाश राठोड (34), राजेंद्र राजपूत (51), अकबर पठाण (52), आनंद देसाई (53) आणि आनंदा निकाळजे (35) यांचा समावेश आहे.

या घटनेनंतर अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button