citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात ऑपरेशन थंडरअंतर्गत मोठी कारवाई; एमडी पावडरसह आरोपी अटक

नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जरीपटका पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि मोपेड असा एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत.

याच मोहिमेदरम्यान जरीपटका पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. निर्मल कॉलनी रोडवरील अशोका रसोईजवळ एक व्यक्ती एमडी पावडर विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन व्यक्ती एका निळ्या रंगाच्या मोपेडजवळ उभ्या असल्याचे दिसून आले.

पोलिसांना पाहताच त्यातील एक जण घटनास्थळावरून फरार झाला. तर दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली.

त्याने आपले नाव मोहम्मद सादिक मोहम्मद रफीक अन्सारी, वय ३४ वर्षे, रा. मोमीनपुरा, नागपूर असे सांगितले.

एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीकडून दोन ग्रॅम एकोणीस मिलीग्रॅम एमडी पावडर आढळून आली.

याशिवाय एक मोबाईल फोन आणि एमएच ४९ सीएच ८७९८ क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे एक लाख वीस हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला यश मिळत असून अशा कारवायांमुळे ड्रग्ज विक्रेत्यांवर मोठा दबाव निर्माण होत आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button