रीवा अपघातातील साध्वींच्या मृत्यूच्या निषेधार्थ बडनेरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा

मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात जैन समाजातील दोन साध्वींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बडनेरा येथे सकल जैन समाज आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बडनेरात मूक मोर्चा काढण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रीवा, मध्य प्रदेश येथे २० मे २०२५ रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातात जैन समाजातील दोन साध्वींचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ बडनेरा येथे सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जैन मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे बडनेरा पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला.
मोर्चादरम्यान समाजबांधवांनी शांततेत निषेध व्यक्त करत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
जैन धर्मामध्ये साधू आणि साध्वींना अत्यंत पूजनीय स्थान आहे. ते अहिंसा, संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देत पायी विहार करीत असतात. कोणत्याही वाहनाचा वापर न करता सतत पदयात्रेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य ते करतात.
मात्र अशा साध्वींचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने जैन समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात जैन साधू-साध्वी विहार करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही समाजातर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सकल जैन समाजाने व्यक्त केली आहे. रीवा अपघातानंतर जैन समाजाने उपस्थित केलेला सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



