नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर; मुदखेड-अर्धापूरमधील केळी बागा जमीनदोस्त

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील केळी बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. आधीच डिझेल टंचाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाने आणखी एक मोठे संकट ओढवले आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. मध्यरात्री झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुदखेड तालुक्यातील निवघा आणि अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागा काही मिनिटांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकीकडे डिझेल टंचाईमुळे शेतीची अनेक कामे रखडली आहेत. त्यातच या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि मोठा खर्च करून केळी बागा उभ्या केल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. निसर्गाच्या सततच्या तडाख्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी आता आणखी अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू असून लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.



