बीडमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा; केज तालुक्यातील केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बीड जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. विशेषतः केज तालुक्यातील युसुफ वडगाव आणि सादोळा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र काढणीच्या टप्प्यावर आलेल्या केळीच्या बागा काही मिनिटांतच वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केल्या. अनेक शेतकऱ्यांनी एकरी जवळपास एक लाख रुपयांपर्यंत खर्च करून केळीची लागवड केली होती. बाजारात माल विक्रीसाठी नेण्यापूर्वीच निसर्गाच्या तडाख्याने संपूर्ण मेहनत वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे केवळ शेतीचेच नव्हे तर घरांचेही नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, “गेल्या अनेक दशकांपासून एवढ्या वेगाने वारे वाहताना पाहिले नव्हते. शंभर टक्के नुकसान झाले आहे. आता शेतातून पडलेल्या केळी बाहेर काढण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत.”
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. पंचनामे करा किंवा नका करू, मात्र किमान शेतातून केळी बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू असून प्रभावित भागात पंचनामे करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



