पुण्यात हॉटेलमध्ये गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; मालकासह दोन जण गंभीर जखमी

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात कोदावडी फाटा परिसरात असलेल्या ‘श्रीनाथ हॉटेल’मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दहशतीचा प्रकार घडला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हवेत गोळीबार करत हॉटेलमध्ये धुडगूस घातला आणि हॉटेल मालकासह एका कामगारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास किरकोळ वादातून हा प्रकार घडला. वादानंतर संतप्त झालेल्या टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्या, साहित्य तसेच हॉटेल मालकाच्या दुचाकीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हल्लेखोरांनी कोयत्याने हॉटेल मालक मयूर दसवडकर आणि कामगार दशरथ शिळीमकर यांच्यावर वार केले.
या हिंसक हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती.
प्राथमिक माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
माहिती मिळताच राजगडच्या वेल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ विशेष पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



