मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, २८ जण जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर गावालगत झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू घेऊन जाणारा एक ट्रॉला अचानक विरुद्ध दिशेने घुसला आणि मालेगावकडून धुळ्याकडे येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, काही वेळातच मालेगावहून इंदूरकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन आदळली. या तिहेरी अपघातात ट्रॅव्हल्समधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच ट्रक आणि वाळूच्या ट्रॉल्याला मदत करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला. तर जखमींपैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
या भीषण अपघातात एकूण २८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.



