WHO कडून इबोला संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर; भारत सरकारकडूनही सतर्कतेचा इशारा

जग पुन्हा एकदा गंभीर आरोग्य संकटाच्या छायेखाली आले आहे. आफ्रिकेतील काँगो आणि युगांडा येथे इबोला विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने “Public Health Emergency of International Concern” अर्थात आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे हा “Bundibugyo” प्रकारचा इबोला विषाणू असून यासाठी अद्याप अधिकृत लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नसल्याने जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे.
WHO च्या माहितीनुसार, काँगो आणि युगांडामध्ये इबोलाचे शेकडो संशयित रुग्ण आढळले असून मृत्यूंची संख्याही वाढत आहे. काँगोमधील Ituri, North Kivu आणि South Kivu भागांमध्ये संसर्ग वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक कारणास्तव प्रवास करणाऱ्यांनी WHO आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारताने आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी पुढाकार घेत अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य, PPE किट, मास्क आणि औषधांची मदत Africa CDC कडे पाठवली आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती देत भारत आफ्रिकन देशांसोबत ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इबोला हा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, उलटी किंवा शरीरातील इतर द्रवांच्या संपर्कातून हा संसर्ग पसरतो. ताप, तीव्र अशक्तपणा, उलट्या, रक्तस्राव आणि अवयव निकामी होणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
WHO आणि विविध देशांच्या आरोग्य यंत्रणा सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सीमावर्ती भागांमध्ये तपासणी, रुग्ण शोध मोहीम, विलगीकरण केंद्रे आणि जनजागृती मोहीम सुरू करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरून न जाता अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.



