“दुसऱ्यांच्या स्वप्नांची इमारत उभी करताना गमावला जीव!” अकोल्यात सातव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

अकोल्यातील मूर्तिजापूर रोड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर एक भीषण दुर्घटना घडली आहे. सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत मजुराची ओळख शिवनी येथील शेख असलम अशी झाली आहे. तो संबंधित बांधकाम प्रकल्पावर काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, असलम हे बांधकाम साहित्य लिफ्टच्या सहाय्याने वर पोहोचवण्याचं काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट सातव्या मजल्यावरून खाली कोसळले.
हा अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी तातडीने शेख असलम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बांधकाम स्थळावरील सुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, मृत मजुराला सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि सुरक्षा बूट यांसारखी अत्यावश्यक सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या, तर एका मजुराचा जीव वाचू शकला असता,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खदान पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बांधकाम स्थळी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, संबंधित ठेकेदार किंवा व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केला का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.
अकोल्यातील ही घटना पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आली आहे. उंच इमारतींवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी नियम असले तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, हा मोठा प्रश्न या दुर्घटनेमुळे समोर आला आहे.
आता तपासातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि जबाबदारांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



