citynewsJalnaLatest NewsMaharashtra

“पर्यावरण वाचवा”च्या घोषणा एकीकडे… तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड! जालन्यात वनविभागाची मोठी कारवाई

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवैध वृक्षतोडीविरोधात वनविभागाने मोठी कारवाई करत कडुनिंब लाकडाचा मोठा साठा जप्त केला आहे. आन्वा येथे टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वनपरिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वनपरिमंडळ भोकरदनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गस्तीदरम्यान अवैधरित्या वृक्षतोड करून लाकूड साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने मौजे आन्वा येथे छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कडुनिंबाच्या झाडांची अवैध तोड करून लाकूड साठवण्यात आल्याचं आढळून आलं. वनविभागाने या ठिकाणाहून सुमारे 5.528 घनमीटर कडुनिंब लाकूड जप्त केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी खालिद मसुद शेख यांच्याविरोधात वन गुन्हा क्रमांक T05/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक आणि संबंधित पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवत अवैध वृक्षतोडीचा पर्दाफाश केला.

वनविभागाने या कारवाईनंतर स्पष्ट इशारा दिला आहे की, पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. जंगल आणि पर्यावरण संवर्धनासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही विभागाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, वाढत्या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. झपाट्याने कमी होत असलेली झाडं, वाढतं तापमान आणि बदलतं हवामान यामुळे वृक्षसंवर्धनाची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे.

आन्व्यातील या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, आता वनविभाग आणखी कोणत्या ठिकाणी कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button