AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील शेगाव रोड परिसरात पहाटेच्या शांततेला हादरा देणारी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात राहणारे पिंजरकर हे ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेजवळून जात असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली.

अचानक झालेल्या या हल्ल्यात रानडुकराने त्यांना खाली पाडून गंभीर जखमी केले. हल्ल्यादरम्यान त्यांच्या हाताच्या एका बोटाला गंभीर दुखापत झाली असून ते तुटल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांची सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच भागात यापूर्वी बिबट्याच्या वावराच्या घटनाही समोर आल्या होत्या. नाल्यालगत वाढलेल्या डुकरांच्या संचारामुळे आता रानडुकरांची दहशत वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मोकळ्या जागेला संरक्षक भिंत उभारणे, नाल्याचे बंदिस्तीकरण करणे आणि वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेनंतर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वन विभाग आणि प्रशासन याबाबत कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button