citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपुरात मोठी कारवाई; एमडी पावडरसह दोघांना अटक

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जुनी कामठी पोलिसांनी एमडी पावडर जप्त करत तब्बल १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बडी मस्जिद परिसरातील नया बाजार येथे सापळा रचला. जमाल डेली निड्स दुकानासमोर संशयास्पद हालचाल करणाऱ्या बर्गमन दुचाकीस्वारांना अडवून चौकशी करण्यात आली.

तपासादरम्यान सलमान उर्फ माया मंजूर अहमद आणि मोहम्मद बिलाल नागानी यांच्या ताब्यातून १२.६५ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी आरोपींकडून एमडी पावडर, दोन मोबाईल फोन आणि बर्गमन दुचाकीसह एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्राथमिक तपासात आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने एमडी पावडर बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. या कारवायांमुळे ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले असून शहरात अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button