“ऑपरेशन सावरगाव” यशस्वी! 48 तास जंगलात सर्च ऑपरेशन; 105 पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

अकोला जिल्ह्यातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील गंभीर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तब्बल 48 तास घनदाट जंगलात सुरू असलेल्या सर्च ऑपरेशननंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. “ऑपरेशन सावरगाव” नावाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
ही धक्कादायक घटना 5 मे 2026 रोजी अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथे घडली होती. पीडित 10 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना गावातीलच 60 वर्षीय आरोपी जगराम गोविंदा आडे याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर मुलीला ही बाब कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मात्र पीडित मुलीने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा नोंदवला.
प्रकरणाची संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाला होता. विशेष म्हणजे आरोपीकडे कोणताही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक साधन नसल्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत होतं.
त्यातच आरोपीने आश्रय घेतलेला परिसर घनदाट जंगल आणि दुर्गम भागात असल्याने शोधमोहीम अधिक कठीण बनली होती. मात्र पोलिसांनी हार न मानता मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केलं.
या “ऑपरेशन सावरगाव”मध्ये स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी युनिट, डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेरे, वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. तब्बल 105 पोलिस कर्मचारी सलग 48 तास जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते.
अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि आरोपी जगराम गोविंदा आडे याला सावरगाव जंगल परिसरातून अटक करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात फॉरेन्सिक तपास प्रक्रिया सुरू असून 30 दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या ऑपरेशनमधून देण्यात आला आहे.
आता पीडित अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.



