बलात्कार व लैंगिक अत्याचारातील दोषींना पॅरोल बंद करण्याची मागणी; कायद्यात बदलाचे संकेत

मुंबई : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण मागणी महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याकडे मंत्रिमंडळ बैठकीत निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेणे आवश्यक झाले आहे.
तसेच, अशा दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येऊ नये, अशी स्पष्ट तरतूद कायद्यात करण्यात यावी, जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि न्यायव्यवस्थेबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कठोर आणि धोरणात्मक निर्णय घेत असल्याचेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.



