citynewsLatest NewsMaharashtraNashik

शिर्डी जमीन घोटाळा प्रकरण; अशोक खरात 9 मेपर्यंत पोलीस कोठडीत

शिर्डीतील गाजलेल्या जमीन खरेदी घोटाळा आणि समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला राहाता न्यायालयाने 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (5 मे) न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शिर्डी पोलिसांनी अशोक खरात याला सोमवारी (4 मे) रात्री नाशिक येथून ताब्यात घेतलं होतं. मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरात याला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं की, तक्रारदार रावसाहेब गोंडकर यांच्या मालकीची जमीन अशोक खरात याने कमी किमतीत खरेदीखत करून स्वतःच्या ताब्यात घेतली. तसेच, तक्रारदाराला दरमहा 2 टक्के व्याजदराने पैसे देत व्यवहार केल्याचा आरोपही तपासात समोर आला आहे.

या प्रकरणात अशोक खरात याने जमीन खरेदीसाठी आणि कर्ज व्यवहारांसाठी वापरलेली तब्बल 5 कोटी 52 लाख रुपयांची रक्कम नेमकी कुठून आली? याचा तपास पोलीस करत आहेत. या रकमेचा स्रोत, आर्थिक व्यवहारांची साखळी आणि समता पतसंस्थेतील बनावट खात्यांशी असलेला संबंध याचा तपास आता वेगाने होणार आहे.

शिर्डीतील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणात अशोक खरातच्या पोलीस कोठडीमुळे अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर आणते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button