citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळची लेक ठरली महाराष्ट्राची टॉपर! ६०० पैकी ६०० गुण मिळवत किमया वातीले राज्यात अव्वल

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी अभिमानास्पद कामगिरी यंदाच्या बारावीच्या निकालात पाहायला मिळाली. यवतमाळच्या किमया शितल वातीले हिने बारावीच्या परीक्षेत तब्बल ६०० पैकी ६०० गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून, यंदा यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ८७.७५ टक्के लागला आहे. या निकालात जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी किमया शितल वातीले हिने शंभर टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवलं आहे.

किमयाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे यवतमाळ जिल्ह्याचा शैक्षणिक झेंडा राज्यभरात उंचावला असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण जिल्ह्यातून किमयाचं कौतुक केलं जात आहे.

किमया सांगते, “यश मिळवायचं असेल तर पहिल्या दिवसापासून सातत्याने मेहनत घ्यावी लागते. अभ्यासात नियमितपणा आणि शिस्त असेल तर यश नक्की मिळतं.”

तिने विद्यार्थ्यांना विशेष संदेश देताना सांगितलं की, “मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेचं योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचं खरं सूत्र आहे.”

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं, असा ठाम विश्वासही किमयाने व्यक्त केला.

या अभूतपूर्व यशामागे आपल्या आजोबा, आई-वडील आणि शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचं किमयाने नमूद केलं. कुटुंबीयांचा पाठिंबा, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याचं तिने सांगितलं.

किमयाच्या या घवघवीत यशामुळे यवतमाळ जिल्हा अभिमानाने भरून गेला असून, राज्यात यवतमाळच्या लेकीने अव्वल ठरवत जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button