citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraPune

भोर हादरलं… महाराष्ट्र सुन्न! ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; आरोपी अटकेत, SIT स्थापन

भोर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली असून, या प्रकरणाने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला अटक केली असून, त्याचा यापूर्वीही लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारी इतिहास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत एकांत ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

ही घटना उघड होताच भोर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. निषेध म्हणून नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू महामार्ग काही तास रोखून धरत तीव्र आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पीडितेच्या कुटुंबीयांनीही आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या वडिलांनी भावनिक आवाहन करत, “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत कुठलाही राजकीय दौरा नको, फक्त आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,” अशी भूमिका घेतली आहे. कुटुंबीयांनी न्यायासाठी ठाम लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं असून, तपास वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, महिलां आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायदा-सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई या मुद्द्यांवर आता पुन्हा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button