बडनेरातील मनपा उद्यानाची दुरवस्था; गवत, कचरा, तुटलेली खेळणी अन् अंधारामुळे नागरिक त्रस्त

बडनेरा : शहर सुशोभीकरणाच्या गप्पा एका बाजूला आणि प्रत्यक्षात उद्यानांची दुरवस्था दुसऱ्या बाजूला, असंच चित्र सध्या बडनेरा शहरात पाहायला मिळत आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात शिक्षक कॉलनी आणि म्हाडा कॉलनी यांच्या मधोमध असलेलं मनपा उद्यान सध्या अक्षरशः दुर्लक्षाचं बळी ठरत असून, नागरिकांसाठी धोकादायक बनलं आहे.
नागरिकांना विश्रांती, ज्येष्ठांना फेरफटका आणि मुलांना खेळण्यासाठी उभारलेलं हे उद्यान आज गवत, कचरा आणि अंधाराच्या विळख्यात अडकलं आहे.
उद्यानात हिरवळ राखण्याऐवजी मोठमोठं गवत वाढून झुडपांचा अड्डा तयार झाला आहे. साफसफाईचा पूर्ण अभाव असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचलेले दिसून येत आहेत. परिणामी उद्यानात दुर्गंधी पसरली असून, डास आणि कीटकांचं प्रमाणही वाढलं आहे.
लहान मुलांसाठी बसवण्यात आलेले झोपाळे, घसरगुंडी आणि खेळणी तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. या तुटलेल्या साहित्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
उद्यानातील पथदिवे बंद असल्याने संध्याकाळनंतर संपूर्ण परिसर अंधारात बुडतो. यामुळे महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.
पादचारी मार्ग तुटलेल्या अवस्थेत असून, सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यायामासाठी बसवलेली साधनंही मोडकळीस आली असून, त्यांचा वापर करणे धोकादायक बनले आहे.
याशिवाय उद्यानातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने झाडं कोमेजू लागली आहेत. सुरक्षारक्षक नसल्यामुळे उद्यानात मोकाट जनावरांचा आणि असामाजिक घटकांचा वावर वाढला असून, त्यामुळे नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत उद्यानात तातडीने स्वच्छता मोहीम, तुटलेल्या साहित्याची दुरुस्ती, पथदिवे सुरू करणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कररूपाने लाखो रुपये वसूल करणाऱ्या मनपेकडून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बडनेरातील या मनपा उद्यानाची दुरवस्था प्रशासनाच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करत असून, आता तरी महानगरपालिका जागी होणार का, की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



