AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव; सरकारी रुग्णालय परिसरातील तुंबलेल्या नाल्यांची तातडीने स्वच्छता

अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना, सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम दिसून आला आहे. जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या सरकारी रुग्णालय परिसरातील तुंबलेल्या नाल्या आणि साचलेल्या कचऱ्याच्या समस्येवर अखेर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे.

जवाहर स्टेडियम प्रभाग ७ अंतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डफरिन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत होत्या. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येत होते. नाल्यांमधून काढलेला कचरा देखील बाजूलाच ढिगाऱ्यांमध्ये पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते.

या अस्वच्छतेचा थेट परिणाम रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.

या गंभीर समस्येची सिटी न्यूजने दखल घेत सविस्तर वृत्त प्रसारित केले. बातमी प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने कारवाईला सुरुवात करण्यात आली.

प्रभाग क्रमांक ७ चे आरोग्य निरीक्षक धनीराम कलोसे यांनी त्वरित सफाई कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. जेट मशीनच्या सहाय्याने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच नाल्यांमधून बाहेर काढलेला कचरा देखील तातडीने उचलण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली.

या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने वेळेत आणि सातत्याने लक्ष दिल्यास अशा समस्या सहज सोडवता येऊ शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून प्रशासनाने घेतलेली ही तातडीची दखल निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, अशीच तत्परता आणि जबाबदारी प्रत्येक वेळी दिसली, तर अमरावती शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button