नागपुरात तीन घरफोड्यांचा उलगडा; सोने-चांदीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी गजाआड

घर बंद करून कुटुंब लग्नाला गेलं… आणि मागे राहिलेल्या रिकाम्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला…
नागपूर शहरात वाढत्या घरफोडींच्या घटनांदरम्यान गुन्हेशाखा युनिट क्रमांक ४ ने मोठी कारवाई करत तब्बल तीन घरफोड्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत सोने-चांदीचे दागिने, घड्याळे आणि इतर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश वामनराव फिरके हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे दागिने, जुने टायटन घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हेशाखा युनिट क्रमांक ४ ने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दशरथ उर्फ लक्की बद्दूलाल सावखे या संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत आरोपीने केवळ ही एकच घरफोडी नव्हे, तर आणखी दोन घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान वाहन चोरीचे गुन्हे देखील समोर आले असून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड होऊ लागला आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सोने-चांदीचे दागिने, चार घड्याळे आणि इतर चोरीचा मुद्देमाल असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घर बंद ठेवताना नागरिकांनी अधिक सतर्क राहणे, शेजाऱ्यांना माहिती देणे आणि सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, पोलिसांनीही वेगाने कारवाई करत आरोपींना गजाआड केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



