citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात शटरफोडी आणि वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; ५ गुन्ह्यांचा उलगडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात शटरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ने मोठी कारवाई करत शहरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीची वाहने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील कळमना, कोतवाली, नंदनवन, यशोधरानगर आणि जरीपटका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शटरफोडी आणि वाहन चोरीचे प्रकार सातत्याने समोर येत होते. या वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ने तपासाची सूत्रे हाती घेतली.

तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद दिलशाद अन्सारी (वय २३), विवेक उर्फ विकी धोटे (वय २३) आणि पियुष उर्फ गद्दू निमजे (वय २०) या तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसी चौकशीत आरोपींनी २ शटरफोडी आणि ३ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी दाखल असलेले एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.

या कारवाईत आरोपींकडून एक ई-रिक्षा, दोन अ‍ॅक्टिवा दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषण, सततची पाळत आणि अचूक माहितीच्या आधारे ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना कळमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नागपूर शहरात शटरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही कारवाई मोठा दिलासा देणारी ठरली आहे. गुन्हे शाखेच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपी गजाआड गेले असले तरी शहरातील चोरीचे प्रकार पूर्णपणे थांबवण्यासाठी पोलिसांनी अशीच सातत्यपूर्ण मोहीम कायम ठेवणे गरजेचे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button