महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे; आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि तंत्रसज्ज करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राबविण्यात आला असून, या उपक्रमामुळे राज्याची संसर्गजन्य आजारांशी लढण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत केले होते.
या पत्राद्वारे महाराष्ट्राला या योजनेत योग्य वाटा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा, तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.
या संपूर्ण योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या.
कोविड-१९ महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कोविड काळात वेळेत निदान, संसर्गाचा मागोवा आणि उपचार व्यवस्थापनात या प्रयोगशाळांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मोठा आधार दिला.
याशिवाय या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणेही शक्य झाले आहे. आतापर्यंत कोविड-१९चे ३७,२१,१५४, डेंग्यूचे ८८,३२७, चिकनगुनियाचे ३९,८१७, झीकाचे ३,९२३, स्क्रब टायफसचे ७,०९१, इन्फ्लुएंझाचे २७,५३६, एचबीव्हीचे १,५३,१८० आणि रोटाव्हायरसचे ६५१ अशा एकूण ४०,४१,६८९ रुग्णांची तपासणी या प्रयोगशाळांमधून करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळाली असून, भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आणि विषाणूजन्य आजारांशी मुकाबला करण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.
राज्यातील आरोग्य क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यातील सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.



