citynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

गंगापूरमध्ये शौचालयात चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार; महिलेचा गुप्त व्हिडिओ काढणाऱ्या शेजाऱ्यावर गुन्हा

गंगापूर शहरातील फुलेनगर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेला हादरा देणारी संतापजनक घटना समोर आली आहे. शौचालयात गेलेल्या ३२ वर्षीय महिलेचा परवानगीशिवाय गुप्त व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसोबत गंगापूर शहरातील फुलेनगर भागात भाड्याच्या घरात राहत होती. त्याच परिसरात आरोपीही शेजारी राहत होता. दोन्ही कुटुंबांची बाथरूम वेगवेगळी असली, तरी ती एकाच पत्र्याच्या शेडखाली शेजारी-शेजारी बांधण्यात आली होती.

मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पीडित महिला शौचालयात गेली असता तिला वरून काहीतरी हालचालीचा आवाज ऐकू आला. संशय आल्याने तिने वर पाहिले असता पत्र्याच्या फटीतून मोबाईल दिसल्याने ती हादरली.

प्रकार लक्षात येताच महिला तात्काळ बाहेर आली आणि तिने आपल्या पतीला याबाबत माहिती दिली. यानंतर दोघांनी शेजारच्या बाथरूमकडे धाव घेतली. त्यावेळी आरोपी शेजारच्या बाथरूममधून बाहेर येताना दिसला आणि त्याच्या हातात मोबाईल असल्याचेही आढळून आले.

महिलेच्या पतीने आरोपीचा मोबाईल तपासला असता, पीडित महिलेचा परवानगीशिवाय काढलेला गुप्त व्हिडिओ त्यामध्ये आढळून आला. हा प्रकार उघडकीस येताच संतप्त कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गंगापूरमधील ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर महिलांच्या खासगीपणा आणि सुरक्षिततेवर झालेला गंभीर आघात आहे. घराच्या सुरक्षिततेतही महिलांना अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तींचा सामना करावा लागत असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा घटनांविरोधात तात्काळ तक्रार आणि कठोर कारवाई हाच एकमेव मार्ग आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button