अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३ पदांसाठी २३ उमेदवार रिंगणात

अमरावतीत आज राजकीय नव्हे, तर कायदेशीर क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मतदान प्रक्रिया पार पडत असून, मतदानाला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. वकील संघाच्या एकूण १३ पदांसाठी यंदा २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगतदार झाले असून, न्यायालय परिसरात दिवसभर उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सकाळपासूनच वकिलांनी मतदान केंद्रावर गर्दी करत आपला मतदानाचा हक्क बजावला. वकिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहता यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीतील विशेष आकर्षण म्हणजे अध्यक्षपदासाठी होत असलेली तिहेरी लढत. अध्यक्षपदासाठी ॲड. प्रशांत देशमुख, ॲड. धनराज साधवाणी आणि ॲड. अनिल विश्वकर्मा यांच्यात थेट तिरंगी सामना होत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निकालाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनीही आज मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, सध्या ही निवडणूक बॅलेट पेपर पद्धतीने होत असून, सर्व निवडणुका अशाच पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात.
वकील संघाच्या निवडणुकीत मतदान शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता खरी उत्सुकता १ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागली आहे.
अमरावती जिल्हा वकील संघाची यंदाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार ठरत असून, १ मे रोजी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण कायदेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.



