वाशिम बाजार समितीत काळ्या हळदीला विक्रमी भाव; कोचा हळदीला तब्बल २१ हजार १५० रुपये

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला, म्हणजेच कोचा हळदीला तब्बल २१ हजार १५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काळी हळद किंवा कोचा हळद ही साध्या हळदीपेक्षा वेगळी मानली जाते. लागवडीदरम्यान बियाणे म्हणून वापरलेली हळद जमिनीत राहून सडते, वाळते आणि त्यातून तयार होणाऱ्या या प्रकाराला ‘कोचा हळद’ म्हटले जाते.
औषधी गुणधर्मांमुळे या हळदीला बाजारात मोठी मागणी आहे. संधिवात, यकृताचे आजार, त्वचेचे विकार आणि इतर अनेक आजारांवर तिचा उपयोग होत असल्याने आयुर्वेदिक औषध निर्मितीतही या हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
सध्या शेतात मशागतीची कामे सुरू असून, मशागत करताना ही कोचा हळद बाहेर येत आहे. बाजारात तिची उपलब्धता मर्यादित असल्याने आणि मागणी वाढल्याने या हळदीला विक्रमी दर मिळत आहे.
इतर हळदीच्या प्रकारांच्या तुलनेत काळ्या हळदीला सर्वाधिक भाव मिळताना दिसत असून, २१ हजार १५० रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकीकडे अनेक शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याची परिस्थिती असताना, काळ्या हळदीला मिळालेला हा उच्चांकी दर शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.



