AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

मातृसेवा संघाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात; महिला वसतिगृहासाठी मदतीची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूरमध्ये मातृसेवा संघाच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेच्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक करत, नूतन महिला वसतिगृह प्रकल्पासह सर्व उपक्रमांसाठी आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली.

सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात हा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी संस्थेच्या स्मृतिफलकाचे अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मातृसेवा संघाने शताब्दी महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून आपली ओळख जपली आहे. महिलांपासून ते बालकांपर्यंत प्रत्येकासाठी निस्वार्थीपणे सेवा देणारी ही संस्था आजही सेवाभावाने काम करत आहे.”

यावेळी महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा बाभूळकर, सचिव डॉ. लता देशमुख, उपाध्यक्ष रश्मी भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेच्या इतिहासालाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात पद्मश्री कमलाताई होस्पेट आणि वेणुताई नेने यांनी मातृसेवा संघाची स्थापना केली. त्यावेळी इंग्रज कुटुंबातील महिलांसाठीच प्रसूतीची सुविधा उपलब्ध होती. मात्र, सामान्य आणि गरजू महिलांनाही सुरक्षित प्रसूतीची सुविधा मिळावी, यासाठी मातृसेवा संघाने पुढाकार घेतला.

“गरिब महिलांना निशुल्क सेवा देताना संस्थेने कधीही व्यावसायिकरणाचा मार्ग स्वीकारला नाही. आजही संस्थेचा सेवाभाव तसाच कायम आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

महिलांच्या आरोग्यासोबतच बाल आरोग्य आणि बालमृत्यू रोखण्यासाठीही संस्थेने महत्त्वपूर्ण काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. सूतिकागृहाच्या माध्यमातून सामान्य नागरिक आजही या संस्थेशी जोडले गेले आहेत, असेही ते म्हणाले.

शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसोबतच महिला वसतिगृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. “संकल्पचित्रानुसार महिला वसतिगृहाच्या इमारतीसाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” आणि “सुरक्षित मातृत्व” अभियानाचाही उल्लेख केला. मातृसेवा संघाची वाटचाल या संकल्पनांशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, आदिवासी आणि दुर्गम भागात महिला व बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button