परतवाड्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; व्हायरल व्हिडिओंनंतर तातडीच्या कारवाईची मागणी

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोंमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू सुरक्षा सेवा संघाने प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परतवाडा शहरातील काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या सामग्रीमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, विशेषतः शाळा आणि ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
शहरातील काही हॉटेल्स आणि कॅफेमध्ये अल्पवयीन मुलामुलींना सहज प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी काही अयोग्य प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या अमरावती जिल्हा महिला प्रकोष्ठाच्या अध्यक्षा नेहा अभय बाजपेयी यांनी अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे शहरातील सर्व हॉटेल्स आणि कॅफेंची तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, अल्पवयीन मुलामुलींना अशा ठिकाणी अनधिकृत प्रवेश देण्यावर बंदी घालावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि कॅफे चालकांवर कठोर कारवाई करावी, तसेच पोलिसांनी अशा ठिकाणी नियमित तपासणी वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे आणि शहरात अधिक कडक नजर ठेवावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
परतवाड्यातील ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासन काय भूमिका घेते आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



