यशोदा नगरमध्ये देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांची धाड; महिला व दोघे ताब्यात

अमरावती : शहरात वाढत्या अनैतिक व्यवसायांवर आळा घालण्यासाठी दामिनी पथकाने आज मोठी कारवाई करत यशोदा नगर परिसरातील देहव्यापार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका महिलेसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा नगर नंबर १, गल्ली नंबर २ येथे अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करत महिला सेलच्या प्रभारी पोलीस निरीक्षक (PI) दीप्ती ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या धाडीत महिला पोलीस हवालदार भाग्यशाली पवार, महिला शिपाई पूजा सपकाळे, रजनी ढवळे, नंदिनी वरटे तसेच चालक हवालदार सातंगे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका महिलेसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाई सुरूच राहणार
दामिनी पथकाच्या या धडक कारवाईनंतर यशोदा नगर परिसरात सध्या शांतता आहे. मात्र, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अमरावतीतील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News



