Accident NewsAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती-बडनेरा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

अमरावती : अमरावती-बडनेरा-अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात घडून बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही दुर्घटना बेलोरा विमानतळ परिसरात घडली. बडनेरा येथील सात मित्र एका चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसर दणाणून गेला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व युवक रात्री सुमारे ११ वाजता बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर परतत असताना हा अपघात झाला.

या दुर्घटनेत मोहम्मद अनस, मोहम्मद तल्हा, मोहम्मद अवेज आणि अब्दुल अन्वेस या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची वये २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण सात जण होते, त्यापैकी तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावती येथील रीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे बडनेरा येथील जुनी बस्ती परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महामार्ग सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
या अपघातामुळे महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फरार ट्रक चालकाला पोलीस कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button