पाण्यासाठी वणवण… नीलगायी विहिरीत पडल्या; वनविभागाने दिले जीवदान

वाशिम : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसत आहे. वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी शिवारात पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या नीलगायींचा कळप चक्क एका खोल, कोरड्या विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरकुंडी परिसरात भीषण उष्णतेमुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात नीलगायींचा कळप शेतशिवारात आला होता. याचदरम्यान, त्या एका खोल कोरड्या विहिरीत पडल्या. विहिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रचंड धडपड केली, मात्र विहीर खोल असल्याने त्यांना बाहेर येणे शक्य होत नव्हते.
ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शिताफीने बचावकार्य सुरू केले. दोरखंड आणि शिडीच्या सहाय्याने सर्व नीलगायींना सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले.
सुटका झाल्यानंतर नीलगायी पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेत निसर्गाच्या सानिध्यात परतल्या.
कृत्रिम पाणवठ्यांची गरज अधोरेखित
जंगलातील पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत. या घटनेत वनविभागाच्या तत्परतेमुळे नीलगायींचे प्राण वाचले असले, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News



